मलकापूर :- शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित हॉस्पीटलचे झालेले बांधकाम हे अवैध व न.प.ची कुठलीही परवानगी न घेता करण्यात आले असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प.मुख्याधिकारी, न.प.प्रशासक तथा तहसीलदार मलकापूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहर न.प. हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघा परिसरातील गणेश नगरस्थित गत् काही वर्षापुर्वी शांती आरोग्यम् हॉस्पीटलची बिल्डींग उभारण्यात आली आहे. सदर बांधकाम करतेवेळी या हॉस्पीटलच्या बांधकाम कामाबाबत न.प. मधून कुठलीही बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते. सदर हॉस्पीटलच्या बांधकामाच्या परवानगीबाबत न.प. कार्यालयात नगर रचनाकार विभाग व बांधकाम विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तेथून कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. तर या कामाबाबतची कागदपत्रेच (अर्थपूर्ण) गहाळ झाली असल्याचे समजते.
तेव्हा मलकापूर शहरात झालेल्या शांती आरोग्यम् हॉस्पीटलच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या कामामध्ये सहभागी असलेल्या मलकापूर न.प.च्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची सुध्दा तात्कळ चौकशी करण्यात यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या ७ जानेवारी २०२५ पासून न.प. बांधकाम विभागात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.