Headlines

खडकपूर्णा नदीपात्रात महसूलचा दणका; दोन टिप्पर पोलिसांच्या ताब्यात

 

देऊळगाव राजा : – खडकपूर्णा नदीपात्र व धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पहाटेच्या सत्रात मोठी कारवाई केली. नारायणखेड परिसरात टाकलेल्या धाडीत दोन टिप्परांसह सुमारे सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली असून वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास ही कारवाई केली. एमएच-२८-बीबी-७४८९ क्रमांकाचा टिप्पर रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला. वाहनातून अंदाजे तीन ब्रास रेती जप्त करण्यात आली. संबंधित चालक व मालकाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान एमएच-२८-बीबी-०५५६ क्रमांकाचा दुसरा टिप्पर पळून जाण्याच्या तयारीत असताना महसूल पथकाने वेळीच अडवला. या वाहनातूनही सुमारे तीन ब्रास रेती आढळून आली. दोन्ही कारवायांमधून एकूण सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकरण देऊळगाव राजा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
नदीपात्रातील अवैध उत्खननावर प्रशासनाने कारवाईची कडक भूमिका घेतली असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!