जळगाव जामोद : – तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे १९ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीदरम्यान घोषणाबाजीवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास डीजेवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरून दोन गट आमनेसामने आले आणि शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी परमेश्वर देविदास ढोन यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दीपक परमेश्वर धुळे आणि कुलदीप इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
