साखरखेर्डा :- गुंज येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून दोन गट आमनेसामने आल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून चार जण जखमी झाले आहेत. प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण १९ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या निवासस्थानासमोर पोहोचली असता, घरात अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने डीजेचा आवाज कमी ठेवण्याची विनंती करण्यात आली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली. अनिल तुपकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. मुरहरी तुपकर जखमी झाले असून त्यांच्या आईलाही दुखापत झाल्याचे नमूद आहे. मुरहरी तुपकर हे माजी सैनिक असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सुरेश माधवराव तुपकर यांनीही तक्रार दाखल केली असून अनिल तुपकर व त्यांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत एका युवकाच्या डोक्याला दुखापत झाल्याचेही नमूद आहे.
दोन्ही फिर्यादींवरून पोलिसांनी गटाने मारहाण, दुखापत करणे, शस्त्रासारख्या वस्तूंचा वापर करणे व शांततेत व्यत्यय आणणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहेत. गावात यापूर्वीही नाली बांधकामाच्या वादावरून तणाव निर्माण झाल्याची पार्श्वभूमी आहे. सध्याच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून पुढील तपास सुरू केला आहे.
