Headlines

धांदरवाडीत मध्यरात्री घरफोड्या; दोन घरे व किराणा दुकान फोडून ऐवज लंपास!

सिंदखेडराजा : – तालुक्यातील धांदरवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे आणि एका किराणा दुकानावर हात साफ करत सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील कैलास केंधळे यांच्या घरी नुकताच लग्नसोहळा पार पडला होता. लग्नानंतर कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करत त्यांनी मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. यानंतर चोरट्यांनी शेजारील एका किराणा दुकानातही प्रवेश केला. दुकानात रोख रक्कम न मिळाल्याने त्यांनी दुकानातील सुमारे 12 किलो काजू लंपास केले. ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यानंतर चोरट्यांनी व्यंकटराव शेळके या वृद्ध दाम्पत्याच्या घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला. घरातील जुनी पेटी बाहेर काढून त्यातील दागिने व काही रोख रक्कम असा मिळून अंदाजे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आशिष इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी वाशिम येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते; मात्र त्यातून ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. दरम्यान, संबंधितांकडून अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. तक्रार प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!