मेहकर :- शहरातील खंडाळा एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत तरुणाचे नाव राहुल खुशालराव बाजड असून तो मूळ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. काही वर्षांपासून तो वाशिम जिल्ह्यातील जाम आढाव येथे मामाकडे राहत होता. तसेच केनवड येथे त्याने कापडाचे दुकान सुरू केले होते.
माहितीनुसार, आज सकाळी खंडाळा एमआयडीसी परिसरात राहुलचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक पाहणीत दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमागे वैयक्तिक कारण असण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मेहकर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमल्याची माहिती मिळाली आहे.
