Headlines

विजयाचा जल्लोष की कायद्याची पायमल्ली? मतमोजणीनंतर नोटा उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल; मलकापूरात अतिक जवारीवाले यांच्यावर गुन्हा दाखल

मलकापूर :- नगर परिषद निवडणूक निकालानंतरचा आनंद काहींना कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करता आला नाही, तर काहींनी विजयाच्या नादात थेट कायद्यालाच आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीनंतर विजय उत्सवात खुलेआम नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत एकावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर शहरातील लोखंडी रेल्वे पुलाजवळ, पारपेठकडील बाजूस सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून विजय उत्सव साजरा केला. या दरम्यान त्याने स्वतः नोटा उधळल्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषद मलकापूरचे उपमुख्याधिकारी विठ्ठल बाळासाहेब भुसारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून अतिकभाई जवारीवाले (रा. पारपेठ, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर कृत्य हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूक २०२५ साठी लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात पोहेकॉ. मोहम्मद रिजवान यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत. सध्या कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विजय उत्सवाच्या नावाखाली नियमांना हरताळ फासण्याचे प्रकार वाढत असल्याने निवडणूक काळातील आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासन व पोलिसांकडून पुढे कोणती ठोस कारवाई होते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!