Headlines

बस अनियंत्रित’ नऊ वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू, चुलत बहीण गंभीर जखमी, संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या

( वृतसंस्था )अमरावती :- भरधाव सिटी बस अनियंत्रित झाल्याने प्रीतम गोविंद निर्मळे (९) या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्यासोबत असलेलीचुलत बहीण वैष्णवी संजय निर्मळे (१२) ही गंभीर जखमी झाली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर सायन्सस्कोर मैदानाजवळ असलेल्या सिटी बसस्टॅण्डवर काल रविवारी ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. माहितीनुसार, प्रीतम व वैष्णवी हे आजी नर्मदा निर्मळे यांच्यासोबत एसटी बसने शिरजगाव कसबा येथून अमरावतीत आले होते. त्यांना रुख्मिणीनगर भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. त्यामुळे नर्मदा या दोघांना घेऊन पायी निघाल्या. अशातच बडनेराहून बसस्थानक चौकात आलेली भरधाव सिटी बस अनियंत्रित झाली. बसने प्रीतमला चिरडले तर, वैष्णवी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. अपघात घडताच चालक रवींद्र डहाके व वाहक शेखर गणरे तेथून पळत बसस्थानकाच्या आवारात असलेल्या पोलिस चौकीजवळ गेले. लहान मुलाला चिरडल्याचे पाहून जमाव आक्रमक झाला व सिटी बसच्या काचा फोडल्या. कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके हे पोहोचले. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवून प्रीतम व वैष्णवीला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्रीतमला मृत घोषित केले. वैष्णवीवर तातडीने उपचार सुरू केले. ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी रवींद्र डहाके व शेख गणरे यांना ताब्यात घेऊन कोतवाली ठाण्यात पाठविले तसेच बस सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात पाठविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *