बुलढाणा: कोलवड शिवारात घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातील सर्व सदस्य झोपेत असल्याची खात्री करून मागील दरवाजातून प्रवेश केला. घरातील लोखंडी दागिन्यांची पेटी उचलून ती शेतात नेली आणि त्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दीपक गोपाळा काटे (वय ३९, रा. कोलवड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २० फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता कुटुंबीय जेवण करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता वडील गोपाळा काटे उठले असता, दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. घरातील इतर सदस्यांना उठवून पाहणी केली असता मागील खोलीचे कुलूप तुटलेले आढळले. लोखंडी पेटी गायब असल्याचे लक्षात येताच शोध घेतला असता ती घरामागील शेतात फेकून दिलेल्या अवस्थेत सापडली. पेटीतील ऐवज चोरीला गेला असून त्यात लहान मुलाचे चांदीचे कडे (१२०० रु.), कानातील सोन्याच्या बाळ्या (२५०० रु.), गळ्यातील सोन्याची ज्युती (१८०० रु.), ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी (१५,००० रु.), सोन्याचे कानातील फुल (१५,००० रु.) आणि पतसंस्थेतून काढलेली २.५० लाखांची रोख रक्कम होती. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.