चिखली :- चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळ भीषण अपघातात एक तरुण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात आलोक श्यामलाल शिंगणे (३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय रमेश पट्टे (२६) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी बस (एमएच-२०-बीएल-१९३६) चिखलीहून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाच्या तेजस्वी प्रकाशामुळे बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. भंगार अवस्थेतील बसमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप होत असून, नागरिकांनी एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.