हातातोंडाशी आलेला घास अज्ञात भामट्याने जाळून हिरावला! मडाखेड खु. शिवारात तुरीच्या गंजीस आग; शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान

जळगाव जामोद : दिवसरात्र राबून, उन्हातान्हात घाम गाळत उभं केलेलं पीक… कर्ज, खर्च आणि घरच्या गरजांचा हिशेब मनात धरून शेतकऱ्याने साठवलेली मेहनत… आणि नेमक्या काढणीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास अज्ञात भामट्याने जाळून हिरावून घेतल्याची संतापजनक घटना मडाखेड खुर्द शिवारात घडली आहे.

मडाखेड खु. येथील शेतकरी नितीन नारायण गायकवाड (वय ५२) यांची शेतशिवार गट क्रमांक ५० मध्ये सुमारे ५ एकर शेती आहे. सदर शेतात त्यांनी कष्टाने घेतलेले तुरीचे पीक सोंगून शेतात गंजी मारून ठेवले होते. मात्र दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास विकास चव्हाण (रा. मडाखेड खु.) यांनी फोन करून शेतातील गंजी पेटल्याची माहिती दिली. तत्काळ शेतात धाव घेतली असता, तुरीची संपूर्ण गंजी जळून खाक झालेली दिसून आली. या आगीत अंदाजे २५ ते ३० क्विंटल तूर जळून गेली असून त्यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमागे कोणीतरी अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक तुरीची गंजी पेटवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मेहनती शेतकऱ्याच्या जिवावर उठणाऱ्या या कृत्यामुळे गायकवाड कुटुंब अक्षरशः उध्वस्त झाले असून पुढील हंगाम कसा काढायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. या प्रकरणी शेतकरी नितीन गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना, दुसरीकडे अशा समाजकंटकांच्या कृत्यामुळे शेतकऱ्याचा कणा मोडला जात आहे. या घटनेचा तातडीने छडा लावून दोषींना जेरबंद करणे, हीच आता शेतकरी वर्गाची रास्त अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!