Headlines

पिंप्रीगवळीत चोरांची दहशत; हार्डवेअर दुकान फोडून रोकड लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

पिंप्रीगवळी : गावात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली दहशत दाखवून दिली आहे. बसस्थानकाजवळील हार्डवेअर दुकान फोडून चोरट्याने थेट काउंटरमधील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिस तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे.
येथील समाधान देविदास ठोसर यांचे रविराज हार्डवेअर हे दुकान आहे. १२ डिसेंबर रोजी समाधान ठोसर काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांचा मुलगा सौरभ ठोसर यांनी दिवसभर दुकान चालवून विक्रीची रक्कम काउंटरमधील ड्रॉवरमध्ये ठेवली आणि सायंकाळी सुमारे ७ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेला. शेजारील दुकानदार संतोष फुकटे व सतीश धनेश्वर हेही बाहेरगावी असल्याने परिसरात रात्री शुकशुकाट होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने १२ डिसेंबरच्या रात्री सुमारे १ वाजता दुकानाच्या बाहेरील टिनपत्र्याचे नट-बोल्ट काढून आत प्रवेश केला. चोरी करताना चोरट्याने मोठ्या शिताफीने अंगातील सदरा काढून तो तोंडाला गुंडाळला आणि काउंटरमधील ड्रॉवरमधून सुमारे ४ हजार ५०० रुपये व काही सुटे पैसे काढून घेत पळ काढला. दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता समाधान ठोसर यांनी दुकान उघडले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ धाड बढे पोलीस ठाण्याला माहिती दिली तसेच गावातील पत्रकार व नागरिकांनाही घटनेची कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नागेश झायले, बिट जमादार गजानन भराड, पोलीस हवालदार शरद बाटे, पो. कॉ. गोपाल चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. फिंगरप्रिंट विभागाचे एपीआय अनिल खोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इमरान खान, समीर शेख व वसीम शेख यांच्या पथकाने विविध ठिकाणचे ठसे घेऊन अहवाल तयार केला.
याप्रकरणी समाधान ठोसर यांच्या तक्रारीवरून धाड बढे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध कायनी अप क्र. ४०५/२०२५, कलम ३०५ (अ) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश झायले व गजानन भराड करीत आहेत. दरम्यान, पिंप्रीगवळीत यापूर्वीही अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून दहा हजार रुपये लंपास करण्यात आले होते. त्यानंतर २९ मे रोजी सुनील भामद्रे यांच्या नाश्त्याच्या दुकानातील गल्ल्यातील रक्कम चोरीला गेली होती. राष्ट्रीय विद्यालय, मराठी प्राथमिक शाळा, साई मंदिर, महादेव मंदिर, माऊली कृषी केंद्र तसेच शेतातील साहित्य चोरीच्या घटनांचा तपास अद्यापही अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, किमान या घटनेत तरी चोरट्यांचा पर्दाफाश होणार का, असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!