बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. उदबोध महाराज पैठणकर यांचा दुबईत कीर्तन व प्रचार दौरा ८ ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महाराजांचे हे दौरे महाराष्ट्र मंडळ, दासबोध अभ्यासवर्ग व गणेश भजन मंडळ यांच्या संयोजनाने होत असून, दुबईतील मराठी मंडळींसाठी हा एक विशेष अध्यात्मिक व सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.
ह.भ.प. उदबोध महाराज हे आपल्या ओघवत्या वाणीने, साध्या परंतु प्रभावी शैलीने समाजप्रबोधन व अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करणारे कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कीर्तनांतून आध्यात्म, भगवद्गीता, दासबोध, तुकाराम गाथा यांचा सखोल अभ्यास आणि समर्पक उदाहरणांद्वारे सामान्य लोकांपर्यंत धर्माचा मोलाचा संदेश पोहोचतो.
दुबईतील मराठी समाजासाठी ही एक गौरवाची बाब असून, बुलढाणा जिल्ह्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील उपक्रमांचे जागतिक पातळीवरील महत्व अधोरेखित करणारी आहे. दुबईत मराठी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने असे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात.
या दौऱ्याला संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तसेच दुबईतील सर्व मराठी बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ह.भ.प. उदबोध महाराज पैठणकर यांच्या वाणीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.