मलकापूर : नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर मलकापूर शहराबाहेर आज, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून धडक दिल्यानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की, हायवे क्रमांक ५३ वर बेलाड फाट्याजवळ कंटेनर क्रमांक एच.आर. ३८ ए.जी. ४७३९ हा वाहनचालक निष्काळजीपणे चालवत होता. त्याने दुचाकी क्रमांक एम.एच. २८ वाय ५१५४ ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शरद दशरथ नारखेडे (वय ५०, रा. झोडगा) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर ताब्यात घेतला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पो.हे.कॉ. भोपळे करीत आहेत.