मलकापूर : घरासमोर येऊन शिविगाळ करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर काठीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना वडजी येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राम गुलाब सोनोने (रा. वडजी, ता. मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या घराजवळ राहणारे सोपान लक्ष्मण सोनोने, सागर लक्ष्मण सोनोने व लक्ष्मण शेनु सोनोने (सर्व रा. वडजी) हे घरासमोर येऊन वारंवार शिविगाळ करत होते. यावेळी राम सोनोने यांनी त्यांना शिविगाळ करू नका असे सांगितले. मात्र याचा राग आल्याने आरोपींनी हातातील काठीने त्यांच्यावर मारहाण केली. तसेच “आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला खलास करून टाकू,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. ६६/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.