देऊळगाव राजा :देऊळगाव मही येथे इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडताना विद्युत धक्का लागून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.३० मार्च) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून बनसोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील रहिवासी गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३७) हे आपल्या घरात वापरात असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडत होते. सध्या घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक नागरिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहेत. त्याचदरम्यान वायर जोडताना अचानक त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला. या घटनेत गणेश बनसोडे हे गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे देऊळगाव मही गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश बनसोडे हे मेहनती व सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गावात ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये मोठी शोकभावना व्यक्त होत आहे.