Headlines

शेतकऱ्याच्या मुलाची MPSC मध्ये झेप; पवन नेमाडेची कर सहायक पदावर निवड

मोताळा : अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पवन कैलास नेमाडे यांनी प्रचंड संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. OBC प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक मिळवत त्यांनी कर सहायक (Tax Assistant) पदावर निवड मिळवली आहे. शेतकरी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत पवन यांनी गावासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
लिहा येथील साध्या आणि अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात पवन नेमाडे यांचे बालपण गेले. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणाची जिद्द त्यांनी कधीही सोडली नाही. लॉकडाऊनच्या काळापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांचा सामना करत त्यांनी दिवस-रात्र अभ्यास करून आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. आई-वडील शेतात कष्ट करत असताना त्यांच्या घामाचे मोल ठेवण्याची जाणीव पवन यांना होती. “आई-बाबांच्या कष्टाचे चीज करायचे,” हा एकच निर्धार मनात ठेवून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. या जिद्दीमुळे दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी मोठे यश मिळवत OBC प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक पटकावला.
पवन यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठे स्वप्न पूर्ण करता येते, याचे ज्वलंत उदाहरण पवन नेमाडे यांनी घालून दिले आहे. गरिब शेतकऱ्याच्या मुलाने मिळवलेल्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पवन नेमाडे हे प्रेरणास्थान ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!