चिखली : रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त रंगांची विक्री होत आहे. मात्र या रंगांमुळे त्वचा व आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा चिखली रोडवरील सुप्रसिद्ध चर्मरोग तज्ज्ञ डॉ. एस. के. गोंधणे यांनी जाहीर पत्रकाद्वारे दिला आहे. नागरिकांनी आनंद साजरा करताना आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. गोंधणे यांनी सांगितले की, बाजारातील अनेक रंगांमध्ये घातक रसायनांचा समावेश असतो. लाल रंगामध्ये मर्क्युरी सल्फाईटसारखे विषारी घटक आढळतात, जे त्वचेवर दुष्परिणाम करून दीर्घकाळात त्वचारोग किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काळ्या रंगात असलेले काही ऑक्साईड्स शरीरात शोषले गेल्यास मूत्रसंस्थेवर परिणाम करू शकतात. हिरव्या रंगातील कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांची अॅलर्जी, सूज किंवा तात्पुरता दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असते. पिवळसर रंगांमध्ये अॅल्युमिनियमयुक्त संयुगे आढळून त्वचेवर चट्टे, पुरळ किंवा दीर्घकालीन दुष्परिणाम दिसू शकतात. निळ्या रंगातील कृत्रिम रसायनांमुळे त्वचेची आग, खाज आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
रंग खेळण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
रंग खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. नखांना नेलपॉलिश लावून संरक्षण करावे. डोळ्यांसाठी चष्म्याचा वापर करावा. रंगाने भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत. शरीरावर जखम असल्यास त्या ठिकाणी रंग लागू देऊ नये.
घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करण्याचे उपाय
लाल रंग: जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा लगदा पाण्यात मिसळावा. नारंगी रंग: बेलफळाचा गर पाण्यात उकळून तयार करावा. हिरवा रंग: गहू, ज्वारी, पालक किंवा इतर हिरव्या पानांचा लगदा करून पाण्यात मिसळावा. पिवळा रंग: एक भाग हळद व दोन भाग पीठ एकत्र करून पाण्यात ढवळावे. काळा रंग: आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर पाण्यासह उकळून तयार करता येतो. जांभळा रंग: बीटाच्या साली किंवा गरापासून आकर्षक जांभळा रंग बनविता येतो.
“रंगोत्सवाचा आनंद नक्की घ्या, पण आरोग्याशी तडजोड करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करून स्वतःला व कुटुंबाला आजारांपासून दूर ठेवा,” असे आवाहन डॉ. गोंधणे यांनी केले आहे. डॉ. गोंधने यांनी विदर्भ लाईव्ह ला सांगितले की रंगपंचमी साजरी करताना उत्साहासोबत सजगतेचीही जोड देणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.