( वृतसंस्था )अमरावती : मशीनमध्ये अडकलेले
एटीएम कार्ड चोरून एका भामट्याने त्यातून ५० हजार विड्रॉल केल्याचा प्रकार यशोदानगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४५ ते १० च्या सुमारास घडला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी समीर ताटर (३२, कैलासनगर) यांच्या तक्रारीवरून ११ ऑगस्ट रोजी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला. समीर हे ८ ऑगस्ट रोजी सकाळी रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये गेले. त्यावेळी त्यांचे कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकले. काढण्याचा प्रयत्न केला असता एटीएम कार्ड निघाले नाही. तेवढ्यात अंदाजे ४५ ते ५० वर्षांचा एक व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी आला. आपल्याजवळ एटीएमच्या गार्डचा मोबाइल नंबर आहे. तो तुम्ही घ्या, असे तो म्हणाला, त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर समीर यांनी कॉल केला. तथा त्याने दिलेल्या सूचनेनुसार, कॅन्सल बटन प्रेस करून पिन कोड देखील टाकला. त्याच वेळी एक ४० ते ४२ वर्षाचा इसम देखील समीर यांच्या बाजूला उभा होता. सर्व प्रक्रिया करूनही एटीएम कार्ड निघाले नाही. त्यामुळे एटीएम कार्ड मशीनमध्ये सोडून ते पत्नीला आणण्यासाठी कैलास नगर येथे गेले. थोड्याच वेळात ५० हजार विड्रॉल झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर झळकला.