Headlines

शेगावमध्ये लाखो भाविकांचा महापूर, संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदिर दिवसभर राहणार खुले

शेगाव :- विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन उत्साहात साजरा होत आहे. लाखो भाविकांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली असून, भाविकांच्या सेवेसाठी मंदिर १९ फेब्रुवारीपासून चोवीस तास दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. प्रगटदिनानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान हभप भरतबुवा पाटील (म्हैसवाडी) यांचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. सायंकाळी ४ वाजता पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दर्शनबारी, श्रीमुख दर्शनवारी, महाप्रसाद, पारायण मंडप तसेच औदुंबर दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातूनही अनेक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हभप श्रीरामबुवा ठाकरे (लातूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य सोहळ्याची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!