आसलगाव : तालुक्यातील वडगाव पाटण येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथील अल्पवयीन मुलगी घरात खुर्चीवर बसून दूरदर्शन पाहत असताना गावातील सुरेश शालिग्राम वावगे (वय ६०) हा तिच्या जवळ येऊन अयोग्य प्रकारे छेडछाड करू लागला. अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीला लाथ मारून तेथून पळ काढला. यानंतरही आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग करत तिच्या शाळेजवळ जाऊन तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर पीडितेची आई आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून तेथून निघून गेल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश वावगे याच्याविरुद्ध अप क्रमांक २०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८, ३५२, ३५१ (३) तसेच पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.