Headlines

पुंडलिक ओंकार पाटील यांची माँ नर्मदा ३८०० कि.मी. पायी परिक्रमा पूर्ण; मलकापूरमध्ये जल्लोषात स्वागत

मलकापूर :- श्रद्धा, संयम आणि अखंड भक्तीचा अद्वितीय संगम अनुभवत मलकापूर नगरीतील ज्येष्ठ नर्मदाभक्त पुंडलिक ओंकार पाटील यांनी माँ नर्मदा देवीची तब्बल ३८०० किलोमीटरची पायी परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ८५ दिवसांत ही कठोर परिक्रमा पूर्ण करून त्यांनी मलकापूरचे नाव संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गावर उज्ज्वल केले आहे.
माँ नर्मदा देवीच्या कृपेने व “ नमामी देवी नर्मदे” या अखंड नामस्मरणाच्या बळावर पुंडलिक पाटील यांनी ही पवित्र परिक्रमा सुरू केली होती. नर्मदा नदीच्या उगमस्थानापासून संपूर्ण परिक्रमा करताना त्यांनी डोंगर-दऱ्या, जंगल, उन्हाताप, पावसाचे झंझावात तसेच शारीरिक कष्ट यांवर मात केली. कोणतीही आधुनिक साधने न वापरता, पूर्णतः पायी चालत ही परिक्रमा पूर्ण करणे हे आजच्या काळात विरळाच उदाहरण मानले जात आहे. परिक्रमेदरम्यान अनेक संत, महंत व साधूंचे आशीर्वाद त्यांना लाभले. विविध तीर्थक्षेत्री त्यांनी नर्मदा मातेची पूजा-अर्चा करत भक्तीभाव जपला. या काळात त्यांनी संयम, साधेपणा व अध्यात्माचा आदर्श समाजासमोर ठेवला. परिक्रमा पूर्ण करून मलकापूर येथे आगमन होताच दुर्गानगर मित्र मंडळ व पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. शहरातील नागरिक, भक्तगण व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीप्रवासाचे कौतुक केले. ही परिक्रमा माझी नसून नर्मदा मातेची कृपा आहे. अशी नम्र भावना पुंडलिक पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पुंडलिक पाटील यांच्या या अद्वितीय परिक्रमेने मलकापूर शहरात भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढीसाठीही हा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!