खामगाव – तालुक्यातील पिंप्री देशमुख शिवारात मुरूम उत्खननाच्या कामादरम्यान जेसीबी मशीनला अचानक आग लागून संपूर्ण मशीन जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
शंकर होनाळे यांच्या मालकीची ही जेसीबी मशीन मुरूम काढण्याचे काम करत होती. उत्खनन सुरू असतानाच मशीनने अचानक पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण मशीन आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच खामगाव येथून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग इतकी भीषण होती की, संपूर्ण मशीन जळून खाक झाले.
सध्या सुरू असलेल्या उष्ण हवामानामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. सततच्या उत्खननामुळे मशीन अत्यंत गरम झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, मशीनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र जेसीबी मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.