अमरावती : दुसऱ्याशी लग्न केलेस, तर मी तुझे लग्न मोडून टाकेन व आत्महत्या करेन, अशी गर्भीत धमकी देत, एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी रविवारी रात्री आरोपी आकाश कुमरे (२८, रा. मोर्शी) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ती तरुणी मैत्रिणीला घेऊन मोपेडने घरी जात असताना, मोर्शी शहरातील एका ठिकाणी आरोपी तिच्यासमोर आला. गाडी थांबव म्हटल्याने तिने गाडी थांबविली. आरोपीने तिच्या मैत्रिणीला घरी निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर, आरोपीने ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू दुसऱ्याशी लग्न करू नकोस, तू जर लग्न केलेस, तर मी तुझे लग्न मोडून टाकेल आणि मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. तिला शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या दिल्या. अचानक घडलेल्या त्या प्रकारामुळे तरुणी जोराने ओरडली. त्यावर तुझ्या आईला सांगितलेस, तर तुला जीवाने मारून टाकेन, अशी धमकी दिली. या प्रकाराने भयभीत झालेल्या तरुणीने तातडीने मोर्शी पोलिस ठाणे गाठले.