देऊळगावराजा :शहरातील चौंडेश्वरी मंदिर परिसरात कांतीलाल सुपारकर यांच्या बंद घराला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत ३ सिलिंडरचा स्फोट झाला. बंद घरात चाट भंडाराचे साहित्य तयार करण्यासाठी उपयोग होत होता. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारे कांतीलाल सुपारकर यांचे घरातून आगीचे लोळ निघू लागले. त्यावेळी शेजाऱ्यांच्या लक्षात आले. तर क्षणात फटाके फुटल्याचे जाणवले. अन एकापाठोपाठ २ सिलिंडरने पेट घेत मोठा आवाज झाला. नगर पालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ व पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. बघता बघता आगीने रुद्र रूप धारण केले, यादरम्यान घरात ठेवलेले २ सिलेंडर एका पाठोपाठ स्फोट होऊन पडीत घराचे मोठे नुकसान झाले. दरम्यान नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत घरातील चाटभांडारचे साहित्य जळून खाक झाले होते. शॉर्टसर्किटमुळे अथवा नुकताच चाटसाहीत्य बनवून कांतीलाल सुपारकर हे दुसरीकडे राहत असलेल्या घरी गेले होते. त्यामुळे अनावधानाने घराला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.