चिखली : – चिखली-जालना महामार्गावर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पत्रकार राजेंद्र सुरडकर (वय ३७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. बेराळा (ता. चिखली) येथील रहिवासी असलेले सुरडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मेरा खुर्द ते असोला दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी तीव्र होती की सुरडकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारमधील अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजेंद्र सुरडकर यांनी चिखली परिसरातील विविध स्थानिक वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून काम केले होते. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकार क्षेत्रात तसेच बेराळा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
