बुलढाणा :- बुलढाणा-चिखली मार्गावर साखळी फाट्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महेश कडुबा लोढे (वय ३०, रा. मोहदरी, ता. मेहकर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश हा भादोला येथील सासरवाडीतून स्वतःच्या कारने (क्रमांक एमएच २८ बीक्यू २४१८) मोहदरीकडे जात होता. दरम्यान, साखळी फाट्याजवळील पुलाच्या परिसरात चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक बीआर ०६ जीसी ८४१२) त्याच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की महेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी हलविण्यात आला. मृतकाचे चुलते केशव माधवराव लोढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार विकास सोनुने करीत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
