देऊळगाव कुंडपाळ :- देऊळगाव कुंडपाळ-आमराई पाटी मार्गावर अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चारजण जखमी झाले असून चारचाकी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील नरवाडे हे पुणे येथील आपल्या मित्रांसह चारचाकी (एमएच 14 एमव्ही 8967) ने देऊळगाव कुंडपाळकडे येत होते. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना अचानक एक रानडुक्कर रस्त्यावर आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्यालगत रमेश भानापुरे यांच्या शेतात उभी असलेल्या दुचाकीला (एमएच 28 बीएन 3212) जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश पाटील नरवाडे तसेच त्यांच्यासोबत असलेले पुणे येथील तीन मित्र जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, अलीकडच्या काळात वन्यप्राणी गावांच्या हद्दीत येण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे रस्त्यांवर अपघात होण्याचा धोका वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.