अनुदानासाठी लाच मागणारा कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडला; मलकापूरमध्ये एसीबीची कारवाई!

मलकापूर :- शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाचखोरीचा खेळ सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कृषी अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. कृषी यांत्रिकीकर उप-अभियान योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने मळणी यंत्र खरेदी केले होते. या यंत्रासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बदल्यात संबंधित कृषी पर्यवेक्षकाने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम चार हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली होती.

लाच देण्यास नकार देत संबंधित शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने आधी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मलकापूर-बोदवड मार्गावरील पिंपळगाव देवी फाट्याजवळील राधास्वामी सत्संग परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावकारे याला पंचांसमक्ष अटक करण्यात आली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांकडून अनुदानासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!