लोणार : तालुक्यातील वढव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीन सुड्याना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रमेश जानकीराम तनपुरे (वय ५५, रा. वढव) यांची पत्नी व मुलाच्या नावाने गट क्रमांक २४८, २५३, २५४ मध्ये शेती आहे. त्यामध्ये सोयाबीन सोंगून त्याच्या चार सुड्या लावण्यात आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने त्या चारही सुड्यांना आग लावली. यामुळे तनपुरे यांचे सहा लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, बीट जमादार गजानन धोंडगे, लेखनिक गणेश लोढे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गजानन धोंडगे, गणेश लोढे, भाऊसाहेब मोरे, गणेश तामसकर करत आहेत.