मलकापूर :- शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पिक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालण्यासाठी नदीवर जात असतात, मात्र मलकापूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे बैल धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देवधाबा येथे आज दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.( प्रवीण काशीराम शिवदे ) वय ३२ वर्ष असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की आज पोळा सण असल्याने शेतकरी प्रवीण शिवदे हे बैलाला आंघोळ घालण्यासाठी खडकी नदीवर गेले होते, काल जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्याने नदीला पूर आलेला होता. त्या दरम्यान प्रवीण बैलाला नदी काठावर उभा राहून बैलाला आंघोळ घालीत होता. यादरम्यान प्रवीणला पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवीणचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहचुन मृतदेह बाहेर काढण्यात आला असून रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला आहे.ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.