मलकापूर ( दिपक इटणारे ) – दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, या उपाययोजना कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. विशेषतः मलकापूर शहरातील काही परीक्षा केंद्रांवर ड्युटीवर असलेले होमगार्डच सुरक्षेला हरताळ फासत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
काही परीक्षा केंद्रांवर हेच होमगार्ड परीक्षा केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्याऐवजी सावलीत बसून आराम करताना, गप्पा मारताना आणि झोप काढताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात कॉपी पुरवणारे टोळके निर्धास्तपणे फिरत आहेत. प्रशासनाने नेमलेले हे कर्मचारी सुरक्षेऐवजी फक्त पगार उचलण्यासाठी आलेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वयोवृद्ध होमगार्डची फरफट, तर काहींचा गफला!
एका बाजूला काही परीक्षा केंद्रांवर वयोवृद्ध होमगार्ड जीवाचे रान करत उन्हात उभे राहून परीक्षेची शुचिता राखण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे काही बेफिकीर होमगार्ड आपल्या कर्तव्यात कुचराई करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत काही होमगार्ड सावलीत आराम करताना स्पष्टपणे दिसत आहेत, तर त्याच केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुणांचे टोळके मुक्त संचार करत असल्याचे दिसते.

नांदुराच्या होमगार्डचा हलगर्जीपणा उघड!
विशेष म्हणजे हे निष्क्रिय होमगार्ड नांदुरा येथील असून, त्यांची ड्युटी मलकापूरच्या परीक्षा केंद्रावर लावण्यात आली आहे. मात्र, ते आपल्या जबाबदारीकडे गांभीर्याने लक्ष न देता शासनाच्या पैशांचा अपव्यय करत आहेत. अशा बेशिस्त आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांमुळे सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षेच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासन कोणती कारवाई करणार?
या बेजबाबदार होमगार्डवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर परीक्षा केंद्रावरील सुरक्षेची अवस्था आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या होमगार्डवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. प्रशासन आता जागे होणार की अशाच बेशिस्त कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार?