किरकोळ वादातून रक्तरंजित शेवट; मोताळा तालुक्यातील पोफळीत तरुणाचा खून! पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

 

मोताळा : तालुक्यातील पोफळी गावात किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (वय ३२) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास पोफळी शिवारातील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात काही जणांनी त्यांना गाठले. पूर्वीच्या वादातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. लाठ्या, काठ्या व लोखंडी हत्यारांनी झालेल्या हल्ल्यात अनिकेत सुरडकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे चुलत भाऊ विजय आमराव सुरडकर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर, लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे, कृणाल जानराव सुरडकर, निलेश बाळ बोदडे आणि कृष्णा रमेश अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!