रात्री ड्युटीसाठी जात असताना दुचाकीस्वारांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरातील टेलिफोन कॉलनी परिसरात रात्री ड्युटी करून घराकडे निघालेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हिसकावून नेल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
शोभा राजेंद्र यादगिरे (वय ६५, रा. गोपालकृष्णनगर) या गेल्या अनेक वर्षांपासून एका खासगी रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या बुधवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास ड्युटीवरून घरी जात असताना देशमुख हॉस्पिटलजवळील वळणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून घेतली व टेलिफोन कॉलनी रस्त्याने पसार झाले. घटनेनंतर यादगिरे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शोधमोहीम राबविली. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी शोभा यादगिरे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक वारे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!