मलकापूर:- मलकापूर आणि खामगाव परिसरातील ढाबे, पानटपऱ्या, अंडा-ऑम्लेट सेंटर आणि चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी खुलेआम देशी-विदेशी दारू व बिअर विक्री होत असून, यामुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कायदेशीररित्या चालणाऱ्या बार व्यवसायावरही याचा मोठा परिणाम होत आहे. मोठ्या कराचा भार सहन करून बार चालवणाऱ्या व्यावसायिकांना ग्राहक मिळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे अवैध विक्रेते कमी किमतीत दारू विकून बाजारावर वर्चस्व मिळवत आहेत. या प्रकारामुळे समाजात दारू सेवनाचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची चिंता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि बार व्यावसायिकांनी केली आहे. तसेच, अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवैध विक्रीला अधिकारी-मालकांचे छुपे समर्थन?
मलकापूर तालुक्यातील दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर) आणि खामगाव विभागातील निरीक्षक यांच्या कथित संगनमतामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनेक वेळा माध्यमांनी आवाज उठवला तरी कारवाई केवळ कागदोपत्री उरते.