शेलगाव बाजारात तूरचोरी; दोघे रंगेहात पकडले, दोघे फरार

 

धामणगाव बढे : – मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथे तुरीच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. उर्वरित दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. शेलगाव बाजार येथील अमोल ज्ञानदेव पाटील (वय ४७) यांनी आपल्या वाड्यात साठवून ठेवलेल्या तुरीच्या मालावर लक्ष ठेवले होते. २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता चार जणांनी संगनमताने त्यांच्या वाड्यात प्रवेश करून तूर पोत्यात भरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी तत्परता दाखवत पाठलाग केला आणि साक्षीदारांच्या मदतीने दोन आरोपींना जागीच पकडले. या झटापटीदरम्यान अन्य दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी ज्ञानेश्वर प्रभाकर तांदुळकर (वय ३०, रा. सावरगाव) व प्रमोद प्रकाश शिंदे (वय ४५, रा. सावरगाव) यांना ताब्यात घेतले असून गौतम लक्ष्मण संस्वार (वय ३५, रा. सावरगाव) आणि श्रीकृष्ण संजय अंभोरे (वय २८, रा. शेलगाव बाजार) हे फरार आहेत. तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाड्यातून सुमारे १ क्विंटल २० किलो तूर (अंदाजे किंमत १० हजार रुपये) चोरीला गेली होती. पकडलेल्या आरोपींचा त्या घटनेतही सहभाग असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय जवरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!