खामगाव :- शहरातील नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर गुरुवारी दुपारी कार आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असून मालवाहू चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टॉवर चौकाकडून जलंब नाका दिशेने जाणारे मालवाहू वाहन (क्र. एमएच-२८-बीए-००८८) आणि केला नगर परिसरातून वन विभाग कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असलेली कार (क्र. एमएच-३०-बीएल-७६२८) यांच्यात जोरदार धडक झाली.
धडकेची तीव्रता इतकी होती की कारमधील एअरबॅग तात्काळ उघडली. अपघातात मालवाहू चालक मनोज वाघ यांना किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
