मोताळा : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा दराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माल खरेदी केला जातो नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते अशीच एक घटना मोताळा तालुक्यात घडली आहे. राजूर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एक जुलै २०२३ रोजी समोर आली होती. याप्रकरणी १ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर येथील रईस खान हबीब खान यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार देऊळघाट येथील अब्दुल लतीफ अब्दुल अजीज यांनी तुमचे सोयाबीन जास्त दराने खरेदी करतो, असे सांगून १ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी रईस खान आणी साक्षीदार यांची ३ लाख ९५ हजार ६५० रुपयांची तूर खरेदी केली आणि पैसे नंतर देतो असे सांगून सोयाबीन घेऊन गेला. मात्र महिना उलटूनही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोस्टेत फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.