मलकापूर :- 13 ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. सायंकाळी 5:15 वाजता सुरू झालेल्या या संचलनात 350 पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांनी पाऊस सुरु असतांना नगरातून घोषच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन केले. नगरातील संघप्रेमी नागरिकांनी विविध ठिकाणी फुलांचा वर्षाव करून संचलनाचे उत्साहात स्वागत केले.
संचलनानंतर विजयादशमी उत्सवाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन्नजी अशोकराव देशपांडे होते, तर मार्गदर्शक म्हणून पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंतजी विनायक जी आमशेकर (केंद्र पुणे) हे होते . मंचावर मा.तालुका संघचालक ज्ञानदेव जी पाटील,मा. नगर संघचालक दामोदरजी लखाणी, आणि मा.नगर सहसंघचालक राजेशजी महाजन उपस्थित होते. शस्त्रपूजनानंतर स्वयंसेवकांचे समूहगीत झाले, आशुतोषजी जोशी यांनी वैयक्तिक गीत, अभिषेक काकड याने अमृतवचन तर आशिष महाजन यांनी संस्कृत सुभाषित सादर केले .शाम उप्पल यांनी मुख्यशिक्षक म्हणून काम पहिले.
प्रमुख अतिथी प्रसन्नजी देशपांडे यांचा सत्कार मा.तालुका संघचालक ज्ञानदेवजी पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय मा. नगर संघचालक दामोदरजी लखाणी यांनी करून, संघाच्या धर्म जागरण, गौरक्षा, पर्यावरण, ग्रामविकास, समरसता, आणि कुटुंबप्रबोधन या गतिविधी व संघ द्वारा चाललेल्या इतर कामांची माहिती दिली. संघांचे काम हे हिमनगा प्रमाणे आहे जरी स्वयंसेवक ते कार्य करीत असतांना दिसत असले तरी जनसामान्यांचे योगदान या कार्यात उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी श्री प्रसन्नजी देशपांडे यांनी आपल्या संबोधनात पर्यावरणाच्या शाश्वत विकासावर जोर दिला. त्यांनी भविष्यातील पिढ्यांच्या गरजा बाधित होणार नाहीत हा विचार करून, पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या संतुलित प्रगतीसाठी संघाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते आ .सुमंतजी आमशेकर यांनी उत्सवाचे महत्त्व सांगताना, देशातील विविध उत्सव आणि सण हे भारतीय संस्कृतीतील ऐकतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीचे स्मरण करून त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच, भगवान बिरसा मुंडा आणि जनजातींचे बलिदानाचे स्मरण करून, त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
आ .आमशेकरांनी समाज सक्षम असेल तरच प्रतिकार करू शकेल तसेच त्यांनी देशातील काही विघातक शक्तींच्या कुटील योजना उघड करताना, मजहब आणि रिलीजनचा आधार घेऊन देश फोडण्याचे व धर्मांतरणाचे प्रयत्न होत असल्याची माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात बांगलादेश आणि नेपाळमधील स्थितीचे उदाहरण दिले.जगभरातील 30 देशांमध्ये हेच प्रयत्न झाले, आणि भारतावरही असेच प्रयत्न केले जात आहेत असे नमूद केले.
समाजात महापुरुष, संत, आणि नेत्यांना जातीमध्ये विभागण्याचे प्रयत्न सुरू असल्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. शेवटी, जगभरातून भारताकडे विश्वकल्याणाच्या अपेक्षेने पाहिले जात आहे, असे नमूद करून, देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदविण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.