मलकापूर :- तालुक्यातील उमाळी-वरखेड रस्त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अरुण राजाराम तडके (55, वरखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरजपाल सुभाषसिंह राजपूत (34) आणि अर्जुन मानसिंह राजपूत (17, उमाळी) गंभीर जखमी झाले. अरुण तडके हे MH 28 AA 7652 क्रमांकाच्या दुचाकीवरून दाताळा येथे कामानिमित्त जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. या अपघातात अरुण तडके यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झालेल्यांना तातडीने नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
*रुग्णालयात तणाव निर्माण*
रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी एकास डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात नाराजी व्यक्त करत किरकोळ तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस निरीक्षक संदीप काळे आणि त्यांच्या पथकाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
*प्रशासनाचा तातडीचा हस्तक्षेप*
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता सचिन तायडे आणि गजानन ठोसर यांनीही मदतकार्य केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.