मलकापूर – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सवानिमित्त मलकापूर शहरात श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र येथून सुरू झालेल्या या दिंडीने शहरातील प्रमुख भागांतून भक्तांना भक्तीरसात न्हावून निघाली.
दिंडीच्या मार्गामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र, पद्मालय, मुकुंद नगर, प्रशांत नगर, टेलिफोन कॉलनी, तुलसी ज्वेलर्स, सत्यम चौक, हनुमान चौक, सुखकर्ता हॉस्पिटल, सावजी फैल, जाधववाडी, आणि पुरोहित कॉलनी या भागांचा समावेश होता. संपूर्ण मार्गावर भक्तांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत केले. फुलांची उधळण आणि ‘दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले होते. दिंडीतील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पावली खेळत संपूर्ण मार्गावर भक्तिरस निर्माण केला. त्यांच्या सामूहिक नृत्याने दिंडीची शोभा अधिकच वाढवली. भाविकांच्या उत्साहाला भर घालत, दिंडीने ठिकठिकाणी उपस्थित मलकापुरकरांचे लक्ष वेधले. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी मार्गावर स्वामी सेवेकर्यांनी विशेष व्यवस्था केली होती. दिंडी सुरू होण्यापूर्वी महाराजांच्या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. मार्गावर ठिकठिकाणी पाणपोई, प्रसाद वितरण, तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.
दिंडी सोहळ्याला शहरातील विविध भागांतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांसह पुरुष आणि तरुणाईनेही या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीरसाचा आनंद लुटला. पालखीच्या पुढे वाद्यवृंद, भजने, जयघोष आणि नृत्याचे सादरीकरण यामुळे हा सोहळा एका पर्वणीप्रमाणे भासला. दिंडीचा समारोप श्री स्वामी समर्थ केंद्र येथे झाला. या ठिकाणी पालखीचे विधिवत पूजन करून भक्तांना प्रवचनाचा लाभ घेता आला. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने झालेला हा दिंडी सोहळा मलकापूरकरांसाठी भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर अनुभव ठरला.