मलकापूरः बुलडाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे महामार्गावरील गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख २९ हजार रूपयांच्या आसपास धान्याची चोरी केली असल्याचे बाब उघड झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक यांनी याबाबत मलकापूर शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.विभागीय व्यवस्थापक आनंद किशोर चांडक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बुलडाणा अर्बनच्या मलकापूर विभाग येथे बुलडाणा अर्बनच्या नांदुरा रोडवर ६ वेअर हाऊस व १ कोल्डस्टोअरेज आहे. त्याठिकाणी निरीक्षणासाठी दोन सिक्युरिटी गार्ड असतात. या वेअर हाऊसमध्ये कापूस, चना, गठाण, तुर, सोयाबीन, मका, साळ, बाजरी असे धान्य साठवून ठेवलेले आहे. ३० जुलैच्या रात्री ८ वा. पासून ते ३१ जुलैच्या सकाळी ७ वा. पर्यंत वेअर हाऊसमध्ये चोरी झाल्याची बाब सिक्युरिटी गार्ड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही बाब निदर्शनात आणून दिली. काही अज्ञात चोरट्यांनी रात्री अंदाजे १ वाजेच्या सुमारास वेअर हाऊसच्या पश्चिमेकडील कंपाऊंड वॉलवरील काटेरी तार कापून आतमध्ये प्रवेश करून गोडाऊनचे लोखंडी शटरचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून गोडाऊनमधील ५० किलो चना असलेले कट्टे ४० नग असे एकूण २० क्विंटल ८० किलो बाजार भाव मूल्य अंदाजे १ लाख २९ हजार रूपयांचे धान्य चोरून नेले.अशी तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द अप. नं. ०३६९/२४ अन्वये बीएनसी कलम ३३४ (१), ३०५ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.