धामणगाव बढे : गुरांसोबत बांधून असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना धामणगाव बढेनजीक पांगरखेड शिवारात १६ जूनच्या रात्री घडली. १७ जून रोजी सकाळी वासराचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच दिनकर बढे यांच्या शेतात दोन बैल, गाय आणि एक वासरू बांधलेले होते. या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. बढे यांनी वासराचा शोध घेतला असता, १६ जून रोजी वासरू मृतावस्थेत आढळून आले. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानभरपाई देण्याची मागणी दिनकर बढे यांनी केली आहे. कापूसवाडी धरणापासून जवळच असून, या परिसराला लागून जंगल असल्यामुळे येथे वन्य प्राण्यांचा संचार आहे. मागील काही दिवसांपासून वाघाचा या भागात संचार असून, शेतातील कुत्रे सुद्धा वन्य प्राण्यांनी फस्त केले आहेत.