मलकापूर:- भाजीपाला खरेदी करत असतांना पाळत ठेऊन पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने दोन लाखांची बॅग पळविल्याची घटना 20 जून रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील जांबुळधाबा येथील रहिवासी दीपक अजाबराव जवरे (वय ३६) गुरुवारी दुपारी पैसे काढण्यासाठी एका हॉटेल नजीकच्या बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत आले होते. पैसे काढल्यावर दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास ते बँकेच्या बाहेर पडले. बुलढाणा रस्त्यावरील एका किराणा दुकानातून त्यांनी प्लास्टिक ग्लास खरेदी केले. त्यानंतर बसस्थानक चौकात एका पान सेंटरवर पाने घेतली. पुढे आदर्श नगर नजीकच्या भाजीपाला दुकानातून भाजी खरेदी करीत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी दोन लाखांची रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड असलेली बॅग पळवली. हा प्रकार एका दुकानदाराने दीपक जवरे यांना सांगितला. त्यांनी बस स्थानक कडे जाणाऱ्या त्या विना नंबरच्या दुचाकीचा पाठलाग केला. मात्र बसस्थानक परिसरात अचानक ती दुचाकी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. त्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक ईश्वर वरगे व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँक ऑफ इंडियाचे व इतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धावाधाव केली. मात्र चोरटे पसार झाले होते.