खामगाव : रस्त्यात उभ्या असलेल्या लोकांना वाचविताना ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद करीत तिघांनी मारहाण केली. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत ऑटोचालकाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ आणि मोबाइल लंपास केला. याप्रकरणी तक्रारीवरून भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारीनुसार, शहेबाज खान बाबूखान ३० हा आपल्या परिवारासह एम. एच. २०-ई.एफ.-८११९ ने छत्रपती संभाजीनगर येथून जनता नगर सिरसगाव देशमुख येथे परत येत होता. दरम्यान, अंत्रज फाट्यावर रस्त्यात बबल्या शंकर चव्हाण आणखी दोघे उभे होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचा धक्का लागला. नंतर ऑटो उलटला. त्यानंतर संबंधितांनी ऑटोजवळ येत, काठ्यांनी व चापटांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ११८ (१), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये बबल्या शंकर चव्हाण आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल केला, तर बबल्या शंकर चव्हाण याने दिलेल्या तक्रारीत भरधाव ऑटो चालवून धडक दिल्यानंतर मारहाण केल्याच्या तक्रारीवरून ऑटोचालक शहेबाज खान बाबूखान ३० विरोधात ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), ३५२, ३५१ (२) (3) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.