जानेफळ : माहेरवरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन २ जुलै रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रुख्मिना प्रशांत साबळे असे मयत विवाहितेचे नाव आहे.
जानेफळ येथील रुख्मिना साबळे या विवाहितेने २ जुलै रोजी राहत्या घरात गफळास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृतक विवाहितेची आई सुमनबाई अरुण वानखेडे (रा.वडप, ता. मालेगाव) यांनी दि.३ जुलै रोजी जानेफळ पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे, तसेच माझ्या मुलीला तिचा पती प्रशांत रोडूबा साबळे, सासू लीला रोडूबा साबळे, नणंद लक्ष्मी रोडूबा साबळे हे तिघे जण तुझ्या माहेरून १ लाख रुपये घेऊन ये नाहीतर आम्ही तुला नांदवणार नाही, तू. रंगाने काळी आहेस असा छळ करून त्रास देत होते. त्यामुळे त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून, तिच्या मृत्यूस उपरोक्त तिघे जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी पती प्रशांत रोडूबा साबळे, सासू लीला रोडूबा साबळे, नणंद लक्ष्मी रोडूबा साबळे यांच्याविरुद्ध नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.