Headlines

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण- प्राचार्य डॉ. अनिल खर्चे

 

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे व्यावसायिक अभ्यासक्रम हा पदविका, पदवी व पदवीत्तर यामध्ये सिव्हील अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, कॉम्पुटर अभियांत्रिकी व इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी या विविध विभागात उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक आठ लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शिक्षण संस्थांमध्ये राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभ देण्यात येतो. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी, मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार, राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, सार्वजनिक विद्यापीठांच्या उपकेंद्रांतील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासनाच्या सक्षम प्राधिकरणाद्वारे राबवल्या जाणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन आणि संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील वार्षिक आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या नवीन प्रवेशित आणि पूर्वीपासून प्रवेशित मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू राहील. त्यात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्यासाठी ९०६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केलेल्या संस्थात्मक, संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणारी अनाथ मुले, मुली यांनाही या योजनेचा लाभ लागू करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!