मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा, तालुका क्रीडा संयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथील बॅडमिंटन कोर्ट मलकापूर येथे करण्यात आले होते. यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स मुलींच्या बॅडमिंटन संघाने दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकाविले. १४ व १७ वर्षाखालील गटात मलकापूर तालुक्यातील विविध शाळेतील संघांनी सहभाग नोंदवला होता. १४ वर्षाखालील गटात अंतिम सामन्यांमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या संघाने वाय.पी. एस संघाला सेट २१-१५, सेट २१-१३ या फरकाने विजय मिळविला. १४ वर्ष खालील संघात कर्णधार कु. कृतिका पहाडे, कु. शनाया पारख, कु. अनया पारख यांनी उत्कृष्ट खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात अंतिम सामन्यांमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या संघाने एम.एस.एम संघाला सेट १५-२१, २१-१३,२१-११ या फरकाने विजय संपादन केला. १७ वर्ष खालील संघात कर्णधार कु.सियल पारख, मनस्वी केला, पलक परदेशी, हुमा कोसर, श्रद्धा वाघोदे या खेळाडूंचा समावेश होता.या शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, तसेच मलकापूर क्रीडा संयोजक दिनेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. मुलींच्या या दोन्ही संघांनी जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. या विजयी संघातील खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, क्रीडा शिक्षक ओम गायकवाड, अजय शिंगणे, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या विजयी संघातील खेळाडूंचे शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.