Headlines

कोलते अभियांत्रिकी मधील “एनसीसी युनिटने गाजवला झेंडा; तीन प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेत

मलकापूर:-पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या एनसीसी युनिटने पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धेअंतर्गत अमरावती विभागात आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तीन प्रकल्पांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. या प्रकल्पांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपयुक्ततेमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रथम क्रमांक “स्मार्ट अॅग्रीकल्चर फार्मिंग” या प्रकल्पाला मिळाला. हा प्रकल्प प्रा. सुदेश फरफट आणि प्रा. मोहम्मद जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी नवकल्पना उद्योगतज्ज्ञ व फॅकल्टी विजय ठाटे यांनी दिली. कॅडेट वैभव जामडाले यांनी हा प्रकल्प उत्कृष्ट पद्धतीने सादर केला. द्वितीय क्रमांक “डिजीज प्रेडिक्शन एआय बेस्ड अॅप” या प्रकल्पाला मिळाला. प्रा. अंकुश नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्स जावेद अहमद, रश्मी पाटील आणि जयश्री कलापाड यांनी हा प्रकल्प सादर केला. हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रात नव्या शक्यता निर्माण करणारा आहे.
तृतीय क्रमांक “स्मार्ट डायनिंग टेबल” या प्रकल्पाला मिळाला. प्रा. मनीष अचालिया यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्स प्रणव बधे, भावेश लवंगे आणि युवराज सशाणे यांनी हा प्रकल्प सादर केला.

अमरावती विभागातून निवडलेल्या या तीनही प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती कमांडिंग ऑफिसर ओमेश शुक्ला यांनी दिली. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील उपाख्य श्री नानासाहेब, सचिव डॉ. अरविंद कोलते, उपाध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ कोलते, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे आणि प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शकांना शुभेच्छा दिल्या.
एनसीसी युनिटचे लेफ्टनंट प्रा. मोहम्मद जावेद यांनी सांगितले, “ही यशोगाथा एनसीसी युनिट, महाविद्यालय, आणि मलकापूर परिसरासाठी अभिमानास्पद आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि मार्गदर्शकांच्या प्रयत्नांचे फलित आहे.”
ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दारे उघडणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!