मोताळा:- बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी-वडगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकींच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी पुन्हई फाट्याजवळ घडली. डिडोळा येथील रहिवासी सचिन खंडागळे (वय २७) हे त्यांच्या दुचाकीवरून (क्रमांक : एमएच २८ बीआर ५६९८) सायंकाळी ५.३० वाजता वडगावकडे जात असताना हा अपघात झाला. त्याचवेळी मोताळा गावातील प्रभाकर दत्तात्रय जवरे (वय ५५) हे आपल्या शेतातून दुचाकीने (क्रमांक : एमएच २८ – एल २३५१) मोताळाकडे येत होते. पुन्हई फाट्याजवळ दोन्ही दुचाकी एकमेकांवर जोरात धडकल्या. या भीषण अपघातात प्रभाकर जवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन खंडागळे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले आणि त्यांच्या पथकातील नापोकॉ रमेश नरोटे, प्रवीण पडोळ, पोहेकॉ अशोक आडोकार, पोकॉ सचिन चव्हाण, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद खर्चे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांना तातडीने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रभाकर जवरे यांना मृत घोषित केले.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी, बोराखेडी वडगाव रस्त्यावरील घटना!
